Tuesday, November 13, 2012

Think Higher

Subscribe Us For Lovely & Innovative Mails... Love Ever Grroups....

शरीरश्रमास पर्याय नाही


प्रशांत दीक्षित -prashant.dixit@expressindia.com
Published: Tuesday, November 13, 2012
आजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी अशा उपयुक्त शास्त्रीय शोधांबरोबरच बँका, विमा, शेअर बाजार अशा व्यवस्थाही बुद्धीने निर्माण केल्या. तथापि, बुद्धीला ही शक्ती प्राप्त झाली ती शरीराच्या विशिष्ट घडणीमुळे. उत्क्रांतीतून ही घडण होत गेली. मात्र बुद्धीच्या विकासामध्ये मेंदूबरोबर शरीरातील अन्य अवयवांनाही महत्त्व असते व या अवयवांना श्रमांचा खुराक लागतो याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, जीवनात मधुमेह, कर्करोग, नैराश्य अशा आजारांनी कायमचे निवासस्थान केले. पैसा मिळत असला तरी स्वास्थ्य दुरावत आहे.
डॅनियल लीबरमॅन हे उत्क्रांतिशास्त्राचे अभ्यासक. शरीराची घडण कशी होत गेली हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. माणसाचे डोके व पाय यांची रचना कशी होत गेली व ते परस्परांना पूरक कसे आहेत याचे उत्कृष्ट विवेचन ते करतात. कलेच्या प्रांतातील प्रतिभा आपल्याला माहीत असते, शास्त्रातील प्रतिभा आपल्या लक्षात येत नाही. शरीराच्या घडणीचा इतिहास उत्क्रांतिशास्त्राच्या अंगाने लीबरमॅन उलगडून सांगतात तेव्हा शास्त्रातील प्रतिभा आपल्या लक्षात येते.
शरीराची रचना व शरीरश्रम यांचा घट्ट परस्परसंबंध आहे. व्यायाम करायला हवा असे सर्वजण सांगतात. पण उत्क्रांतीचा संदर्भ देऊन लीबरमॅन व्यायामाची शास्त्रीय बैठक प्रचंड व्यापक करतात. शरीरश्रम सुखाच्या विरोधात नाहीत तर सुखाकडे घेऊन जाणारे आहेत. शरीरश्रमात धावणे व चालणे अत्यावश्यक आहे. किंबहुना धावण्यामुळेच आपली उत्क्रांती झाली व आपण मेंदू कार्यक्षम करू शकलो असे म्हणता येईल. त्यातही लांबवर जलद चालणे हे अधिक उपयोगी.
याचा वेध उत्क्रांतीत घेता येतो. सुमारे ६० लाख वर्षांपूर्वी माणूस द्विपाद झाला व त्याने चालण्यास सुरुवात केली. त्या वेळी शीतलहर आली होती. त्यामुळे जंगले कमी झाली. माणूस तेव्हा शाकाहारी होता. जंगले कमी झाल्यामुळे त्याला अन्न शोधण्यासाठी भटकंती करावी लागली व म्हणून तो दोन पायांवर उभा राहिला. चालता आल्यामुळे अन्न शोधण्याचा त्याचा पल्ला वाढला.
अन्न सुलभतेने मिळू लागले. काही लाख वर्षांनी दुसरी शीतलहर आली. या वेळी निसर्गात बऱ्याच उलथापालथी झाल्या आणि त्याला प्रतिसाद देताना माणसाने चिंपांझीपेक्षा वेगळा मार्ग पत्करला. माणूस उच्च दर्जाच्या अन्नाच्या शोधात निघाला. जगण्यासाठी त्याला दर्जेदार अन्न हवे होते व जगण्याचे मार्ग शोधण्यासाठी मेंदू कार्यक्षम करायचा होता. म्हणून तो शिकार करू लागला. अन्य प्राण्यांच्या तुलनेत तो दुबळा होता. तरीही तो उत्तम शिकार करू लागला. हे कसे शक्य झाले?
माणसाला लागलेला हत्यारांचा शोध असे याचे उत्तर दिले जाते. हत्यारांमुळे त्याने प्रचंड झेप घेतली हे खरे. पण माणूस चिंपांझीपासून वेगळा झाला साधारण साठ लाख वर्षांपूर्वी आणि त्याला हत्यारांचा शोध लागला साधारण पंचवीस लाख वर्षांपूर्वी.
मग या मधल्या ३०-३५लाख वर्षांच्या काळात माणूस शिकार कशी करीत होता, या प्रश्नावर लीबरमॅन काम करू लागले व त्यांना उत्तर सापडले ते माणसाच्या धावण्याच्या कौशल्यामध्ये. साध्या टोकदार बांबूने माणूस शिकार करू लागला, कारण लांब पल्ल्याची धाव त्याने विकसित केली. अन्य प्राणी त्याच्यापेक्षा शक्तीत सरस होते, पण धावेत त्यांना दमविण्यात माणूस सरस होता. प्राणी एकावेळी लांब उडी टाकतो वा धावतो. पण तो सतत धावू शकत नाही. उलट माणूस कित्येक तास धावू शकतो. प्राण्याला सातत्याने लांब उडय़ा टाकायला लावल्या की तो दमतो. त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. प्राण्यांना धावायला लावून ते दमले की त्यांची शिकार करण्यास माणसाने सुरुवात केली.
लीबरमॅन यांनी शिकारी माणसांची जीवनशैली मांडली आहे. त्या वेळी पुरुष रोज १२ ते १४ किलोमीटर धावत वा चालत होता. याशिवाय खणणे, झाडावर चढणे अशा अनेक शारीरिक कृती करीत होता. बायकाही रोज ९ किलोमीटर चालत. त्या मुलांना खांद्यावर घेऊन चालत. शिकार पाठीवर मारून नेण्याची कला माणसाला अवगत होती. माणसाची खांद्याखालील सर्व रचना, त्याचे कान, डोळे ही धावण्याच्या जीवनशैलीला अनुरूप अशी विकसित होत गेली. धावताना तोल राखणे हे सर्वात महत्त्वाचे होते. माणसाची कानातील रचना याबाबत वैशिष्टय़पूर्ण आहे. याच वेळी माणसाला परस्पर सहकार्य, माहिती घेणे व तिचे वाटप करणे या गोष्टींचे महत्त्व कळत गेले. त्यातून भाषा निर्माण झाली. ही संस्कृतीची सुरुवात होती. हे बौद्धिक उद्योग करण्यासाठी मेंदू वाढत गेला. शारीरिक दुबळेपणाची भर माणसाने दोन प्रकारे भरून काढली. त्याने शरीराची सहनशक्ती कित्येक पटीत वाढविली व तो लांब पल्ल्याची धाव घेऊ लागला आणि मेंदूच्या वाढीला त्याने प्राधान्य दिले.
थोडक्यात, गेली वीस लाख वर्षे आपण उत्तम लांब पल्ल्याचे अ‍ॅथलीट आहोत. पण औद्योगिक क्रांतीपासून आपण शरीरश्रम कमी करण्याकडे अधिक लक्ष दिले. गेल्या पन्नास वर्षांत तर ते खूपच कमी झाले. लीबरमॅन यांनी त्याचेही गणित मांडले आहे.
शिकार करणारा माणूस व आजचा माणूस यांच्या खाण्याच्या प्रमाणात फार फरक पडलेला नाही. पण शरीरश्रमात फार मोठा फरक पडलेला आहे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागांतील माणसाचे शरीरश्रम जवळजवळ थांबले आहेत. शिकारी माणसाचे शारीरिक हालचालींचे प्रमाण १.८ टक्के होते, आज ते १.३ टक्क्यांवर आले. तरीही माणूस आज दमतो तो श्रमाने नव्हे, तर अर्थहीन निष्क्रिय जीवनशैलीमुळे. त्याला पैसा मिळतो, पण शरीराला श्रम मिळत नाहीत. मग तेथे आजारांचा शिरकाव होतो.
आजारांचे मुख्य कारण शरीरातील ऊर्जेचे असंतुलन हे आहे, असे लीबरमॅन सांगतात. शरीरश्रम केले तर हे संतुलन राहते व आजार येत नाहीत. भरपूर चालण्याने हृदय, यकृत, किडनी यांची कार्यक्षमता लक्षणीय सुधारते. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदू हा अत्यंत खर्चिक अवयव आहे.
आपण निष्क्रिय असतो तेव्हाही मेंदू २२ टक्के ऊर्जा खात असतो. अन्य कुठल्याच अवयवाला इतकी ऊर्जा लागत नाही. मेंदूला ही ऊर्जा पुरविण्याचे काम मुख्यत: हृदय व पचनसंस्थेचे असते. लांबवर चालण्याने ती सुधारते. संस्कृती बहरण्यासाठी मेंदू वाढावा लागतो, पण त्या वाढीसाठी शरीराची तंदुरुस्ती अत्यावश्यक असते हे लक्षात येत नाही. माणसाला आराम हवाहवासा वाटला तरी शरीराला श्रम अत्यावश्यक असतात. लीबरमॅन तर म्हणतात की श्रम हेच माणसाचे उत्तम औषध आहे. डॉक्टरांकडून मिळणारी औषधे ही लक्षणे कमी करतात, पण रोग हटत नाही. आज औषधांमुळे माणसाचे आयुष्य वाढले आहे. परंतु रोगांचे प्रमाण कमी झालेले नाही. या असंख्य रोगांचे मूळ शरीरश्रमाला नाकारणाऱ्या भांडवलशाही जीवनपद्धतीत कसे आहे याचे कित्येक दाखले लीबरमॅन देतात. या समस्येत आणखीही गुंतागुंत आहे. शरीरश्रम पूर्वी सहज होते. आता व्यायामासाठी वेळ व भरपूर पैसे लागतात.
व्यायामाच्या सुविधा व त्यासाठी वेळ हे दोन्ही फक्त श्रीमंतांकडे असतात. गरीब व मध्यमवर्गाकडे पैसा नसतो आणि नोकरीला जाण्या-येण्यात त्याचा खूप वेळ खर्च होतो. तो दिवसभर कशात तरी गुंतलेला असला तरी त्याच्या शरीराला श्रम झालेले नसतात. वीस लाख वर्षांची श्रमाची सवय भिनल्यामुळे शरीर तर श्रमासाठी आसुसलेले असते. आजही रोज आठ-दहा किलोमीटर चालण्याची क्षमता शरीरात आहे. शरीराची सर्व इंद्रिये श्रमातूनच विकसित झाली आहेत.
श्रीमंत पैसे देऊन जिममध्ये हे श्रम विकत घेतात. गरिबांना ते परवडत नाही. तो गरीब असला तरी अगदी दोनशे वर्षांपूर्वी राजेरजवाडे जितके श्रम करीत तितकेही करण्याची वेळ त्याच्यावर सध्या येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात भर म्हणजे दर्जेदार, उत्तम अन्न महाग आहे; तर जंक फूड स्वस्त आहे. भारतात गरिबी आहे व श्रमाला वाव देणारी जीवनशैली आपण हद्दपार केली आहे. यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, नैराश्य अशा आजारांचा फटका पाश्चात्त्यांपेक्षा आपल्याला अधिक बसणार आहे.
यावर उपाय एकच. भरपूर चालणे व मुद्दाम शोधून काढून शरीरश्रम करणे. यातही बूट न घालता चालणे अधिक उत्तम. लीबरमॅन यांनी तर 'बेअरफूट वॉकिंग' ही चळवळच सुरू केली. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो. जिथे जिथे शरीरश्रमाचा पर्याय मिळेल तेथे तो मुद्दाम निवडावा. किमान पाच किलोमीटर तरी चालावे आणि पौष्टिक, सकस अन्नाची त्याला जोड द्यावी. तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती श्रम करता हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण अन्न पचविण्याची ताकद श्रमातून मिळते. सध्या लोक अन्नाबद्दल जितके चिकित्सक आहेत तितके श्रमाबद्दल नाहीत. अन्नापेक्षा सुखकर आरामदायी यांत्रिक जीवनशैलीचा धोका अधिक आहे असे लीबरमॅन ठामपणे सांगतात.
शरीरश्रम किती आवश्यक असतात हे आणखी एका अभ्यासावरून लक्षात येईल.
हार्वर्डमध्ये शिकत असताना कोणत्या ना कोणत्या मैदानी क्रीडाप्रकारात मनापासून रस घेणाऱ्या साडेपाचशे विद्यार्थ्यांची तुलना बौद्धिक, बैठे काम करणाऱ्या त्यांच्याच वयाच्या अन्य विद्यार्थ्यांशी करण्यात आली. कित्येक वर्षे सातत्याने दोन्ही गटांचे निरीक्षण करण्यात आले. दुसरा गट खेळणारा नसला तरी अत्यंत काटेकोर जगणारा, व्यसनांपासून अलिप्त राहणारा असा होता. तरीही या गटापेक्षा खेळण्यात रस घेणाऱ्या गटांचे आयुर्मान वीस टक्क्यांनी अधिक आढळले.
मुख्य म्हणजे वृद्धपणात येणाऱ्या अडचणी खेळणाऱ्यांच्या गटात पन्नास टक्क्यांनी कमी आढळल्या. दोन निरोगी गटातील ही तुलना शरीरश्रमाचे महत्त्व ठसठशीतपणे दाखविते. महात्मा गांधींनी हे सर्व वाचलेले नव्हते. पण प्रयोगशील गांधींनी रोजच्या एकादश व्रतात शरीरश्रमाचा समावेश केला होता. अफाट राजकीय व सामाजिक काम करीत असतानाही रोजचे शरीरश्रम त्यांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत टाळले नाहीत.
महात्माजींच्या आधी हजारो वर्षे उपनिषदकारांनी, 'चरैवेति' म्हणजे चालणे, हा जीवनाचा महामंत्र असल्याचे प्रतिपादन केले होते. ऋषींच्या अनुभवजन्य ज्ञानाला लीबरमॅन यांच्यामुळे उत्क्रांतिशास्त्राची जोड मिळाली आहे. चालण्याला, शरीरश्रमाला वाव मिळेल असा दिनक्रम आखणे कठीण असले तरी त्याला पर्याय नाही. उत्क्रांतीचा वीस लाख वर्षांचा हा वारसा आपण टाकला तर आजारी पडण्याशिवाय गत्यंतर नाही.