Saturday, July 7, 2012

विषाणूबाधित संगणकांना महाजालाचे दरवाजे सोमवारी बंद?

मुंबई - इंटरनेटवर (संगणकीय महाजाल) धुमाकूळ घालणाऱ्या 'डीएनएस चेंजर' या व्हायरसमुळे (विषाणू) येत्या सोमवारी (ता. 9) इंटरनेट बंद पडण्याची शक्‍यता आहे. या विषाणूचा मुख्य सर्व्हरवर बंदोबस्त केला असला तरी ज्या संगणकांना याची बाधा झाली असेल त्या संगणकांना सोमवारी इंटरनेटवर सैर करणे शक्‍य होणार आहे, असे सांगण्यात येते. 

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआयने) हा व्हायरस इंटरनेटवर सोडणाऱ्या साखळीचा छडा लावल्यानंतर संपूर्ण व्हायरसबाधित इंटरनेट सर्व्हर न्यायालयाच्या आदेशानुसार बदलण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची मुदत सोमवारी (ता. 9) संपत आहे आणि "डीएनएस चेंजर' व्हायरस असणाऱ्या संगणकात इंटरनेट लॉग इन करण्यात अडचणी येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

"डीएनएस चेंजर' या (मालवेर) व्हायरसमुळे इंटरनेट वेब ब्राऊजर्सच्या संगणकांचे डोमेन नाव हायजॅक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले होते. या सायबर गुन्हेगारांची साखळी "एफबीआय'ने शोधून काढली. हा व्हायरस जगभरातील इंटरनेटवर पसरल्याने संपूर्ण व्हायरसबाधित इंटरनेट सर्व्हर न्यायालयाच्या आदेशानुसार बदलण्यात आले. त्यानंतर "डीएनएस चेंजर' व्हायरसचे अस्तित्व असलेले संगणक इंटरनेट लॉग इन करण्यासाठीची अडचण ठरू शकतात, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी इंटरनेट युजर्सना सावधानतेच्या सूचना देणारे संदेशही गुगल, फेसबुकसारख्या इंटरनेट सेवा पुरवठादारांसोबतच अँटिव्हायरस प्रणाली पुरवणारेही देत आहेत.

जूनअखेरीपर्यंत "डीएनएस चेंजर'ची बाधा तीन लाख संगणकांना झाल्याचा अंदाज सांगितला जात आहे. सर्वाधिक व्हायरसबाधित संगणक (69 हजार) अमेरिकेतील असले, तरी इटली, जर्मनी, भारत, इंग्लंड, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आदी देशांनाही या व्हायरसची बाधा झालेली आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारी इंटरनेट बंद पडू शकते, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे.

No comments:

Post a Comment