Sunday, July 15, 2012

देशप्रेमाचं काय करायचं?


 शफाअत खान ,रविवार १५ जुलै २०१२
मी म्हणालो- आमचं बरं आहे. संस्कारांमुळे विद्यार्थी वर्गात जेवत नाहीत. घरी जेवून वर्गात झोपायला येतात. झोप येत नसेल तर एकमेकांना थोपटतात. घोरतात. झोपेत बरळतात. मुद्दा चुकला तर सरांच्या तोंडाला काळं फासतात. उत्साही विद्यार्थी सरांना गाढवावरून फिरवून आणतात. काही पार्टीचे कार्यकर्ते विनामूल्य गाढवं पुरवण्याची व्यवस्था करतात.हे एवढं ऐकल्यावर अमेरिकेत शिकवणाऱ्या त्या भारतीय प्राध्यापकांनी पुन्हा म्हणून भारतात यायचं नाव काढलं नाही. 
अमेरिकेहून भारतात परतताच आता अमेरिकेच्या वारीवर पुस्तक लिहून काढा,’ असा आग्रह प्रकाशक धरतील, अशा भोळसट समजुतीने मी तिथे भेटलेल्या माणसांवर टिपणं लिहिली होती. हाताशी काही मुद्दे तयार ठेवले होते. वेळ पडलीच तर एखादं स्वतंत्र सामाजिक नाटक रचावं किंवा सिनेमा लिहावा असंही योजलं होतं. परतल्यावर वाट बघितली. पण प्रकाशक किंवा निर्मात्यांचा फोन नाही. शेवटी ते मुद्दे आणि माणसं आजच्या लेखात वापरून अमेरिकापुराण संपवावं असं ठरवलं आहे.
थँक्यू
अमेरिकन समाजाला थँक्यूनावाचा गंभीर आजार झालेला आहे. ते सतत ऊठबस एकमेकांना थँक्यूम्हणत असतात. ते बसमध्ये चढताना रांगेतल्या पुढच्या माणसाला थँक्यूम्हणतात. चढल्यावर वळून मागच्याला थँक्यूम्हणतात. ड्रायव्हरला थँक्यूम्हणतात. बसल्यावर इतर बसलेल्यांना थँक्यूम्हणतात. उतरताना पुन्हा सगळ्यांना थँक्यूम्हणत उतरतात. थँक्यूम्हणणाऱ्यांना पुन्हा थँक्यूम्हणणारेही काही भेटले. तिथे मलाही थँक्यूची लागण झाली. एकदा मी रेल्वेतून एका स्टेशनवर उतरलो. आता थँक्यूसाठी ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत धावायला लागतंय की काय म्हणून मी जरा घाबरून गेलो होतो. पण धावताना कुणी दिसलं नाही. शेवटी रेल्वेच्या डब्याला थँक्यूम्हणून मी स्वत:ची सुटका करून घेतली. आपल्याला अशी थँक्यूची सवय नसते. आपल्याकडे थँक्यूम्हणायची वेळ आपल्यावर कुणी येऊ देत नाही. एखादा थँक्यूम्हणाला तर आपल्याला त्याचा संशय येतो. अशा अतिशहाण्या माणसांशी आपण संबंध ठेवत नाही. असो!
तिथे रस्त्यावरून चालताना एखादा शिंकला तर चालणारे अचानक थांबतात. शिंकणाऱ्याला यातना होऊ नयेत म्हणून गॉड ब्लेस यू..म्हणतात. त्यामुळे शिंकणाराही तीनच्या ऐवजी दोनदाच शिंकतो. ते शिंकेला घाबरतात. अमेरिकेला शिंक येऊ नये म्हणून सर्वत्र गॉड ब्लेस अमेरिका..असं लिहिलेलं असतं.
एकदा समोरून चिनी माणूस येत होता. तो शिंकेल असं वाटून मी गॉड ब्लेस यू..म्हणालो. पण तो शिंकला नाही. चिनी माणसं चेहऱ्यावरून कधीही शिंकतील असं वाटतं; पण ते शिंकत नाहीत. ते मध्येच शिंक अडकून पडल्यासारख्या चेहऱ्याने फिरत असतात. अशी चिनी माणसं इथे सर्वत्र दिसतात.
एक केन नावाचा विद्यार्थी भेटला. तो न शिंकता आपल्या देशावर भरभरून बोलत होता. तिथल्या प्रामाणिक, कष्टाळू माणसांविषयी बोलत होता. त्याच्या देशाने केलेल्या प्रगतीविषयी बोलत होता. चिनी माणसांच्या राष्ट्रभक्तीविषयी बोलत होता. मला असं बोलता येईना. गप्पही बसवेना. मग मी आपल्या माणसांविषयी न बोलता थेट भारतीय आत्म्यालाच हात घातला. आत्म्यावर बोलायला ज्ञानापेक्षा कॉन्फिडन्सची जास्त गरज असते, हे लक्षात ठेवलं म्हणजे त्रास होत नाही. मी आमचा आत्मा फायरप्रूफ, वॉटरप्रूफ, बुलेटप्रूफ असतो..अशा छापाचं बोलत राहिलो. त्या चिनी विद्यार्थ्यांचा पूर्ण कॉन्फिडन्स गेल्यावरच थांबलो.
तिथे रस्त्यावर आफ्रिकन अमेरिकन लोक दिसतात. ते दिसेल तिथे तोंडातल्या तोंडात गाणं म्हणत नाचत असतात. ते रस्त्यावर चालताना नाचतात. रांगेत उभ्या उभ्या नाचतात. आणि हॉटेलात जेवताना काटे-चमचे नाचवत जेवतात. ते आपलं फारसं बरं नसलेलं जगणं एन्जॉय करतात. त्यांचं नाचणं खटकत नाही. त्यांच्या शरीराला नाचणं शोभून दिसतं. आपल्या शरीराला मात्र प्रॉब्लेम आहे. आपलं शरीर मारामारीसाठी घडवलेलं असल्यामुळे नृत्यासारखा पांचट प्रकार आपल्या शरीराला मानवत नाही. अंगावर धावून जाणे, आवाज देणे, हूल मारणे, लोळवणे हे खेळ आपल्या शरीराला शोभून दिसतात. अलीकडे कही मिरवणुकांमध्ये वगैरे उत्साहाने किंचाळत आपण आपलं शरीर नाचवतो; पण तो नाच न वाटता मारामारीच वाटते. असो!
तिथे मी एका हॉटेलात जेवायला गेलो. ऑर्डर घ्यायला एक मेक्सिकन बाई होती. बाई नाचत होती. गंमत करत होती. हसत होती. हसवत होती. जरा काही चुकलं तर परत परत माफी मागत होती. चुकीची शिक्षा म्हणून काहीतरी जास्तीचं खायला आणून देत होती. तिने जेवण आणायला थोडा उशीर होतो आहे म्हणून मला फुकट वाईनचा ग्लास दिला. वर जेवण येईपर्यंत तुम्हाला वाईन देत राहीन,’ असं  म्हणून हसत सुटली. मी जेवण लवकर येऊ नये अशी प्रार्थना करत बसलो.
आपल्याकडे हॉटेलात असं होत नाही. गळ्याला टाय बांधल्यामुळे स्वत:ला गव्हर्नर समजणारा एक माणूस ऑर्डर घ्यायला टेबलापाशी उभा राहतो. हातातल्या मळक्या वहीवर पेन टेकवतो आणि बोलो..म्हणून दरडावतो. बोलो..म्हणताच आपले हात-पाय थंड पडतात. कलकली सुटते. मिनिटाभरात ऑर्डर दिली नाही तर गव्हर्नर आपल्याला पदच्यूत करतील, धक्के मारून बाहेर काढतील म्हणून आपण घाबरतो. चिकन शहाजानीकिंवा पहाडी पनीरअसल्या थिल्लर नावाचं काहीतरी मागवतो. आपण खातो आहोत ते चिकन, पनीर की सुरण- असा वाद न घालता या जेवणाचा आपल्याला आनंद होतो आहे असं स्वत:ला बजावत ते निमूट गिळतो. रात्री झोपण्यापूर्वी आनंदाची अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून गोळी खाऊन झोपतो. असो!
अमेरिकेत सतत हॉटेलात जेवायचा कंटाळा आला म्हणून तिथे स्थायिक झालेल्या एका भल्या मराठी गृहस्थांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी जेवायला गेलो. तिथे टेबलावरच श्यामची आईहे पुस्तक पडलेलं होतं. मराठी गृहस्थ अधूनमधून आपल्या मुलांना इंग्रजीतून साने सरांच्या सॅमच्या मम्मीच्या गोष्टी सांगत असतात. गोष्टी सांगताना अजूनही ते गलबलतात. पण मुलं मात्र खो-खो हसतात. त्यामुळे ते उदास होतात. कधी कधी सर्व सोडून पुन्हा भारतात जावं आणि शांत रडत बसावं असं त्यांना वाटतं. आम्ही वेळ घालवायला एकमेकांना उदास वाटेल असे बरंच बोललो. शेवटी समोरच्या चायनीज हॉटेलातून जेवण आलं. पापड मात्र घरीच भाजले. शेवटी घरी बसून जेवण्याची गंमत काही औरच असते, हे मात्र खरं!
मराठी गृहस्थांकडे एक प्राध्यापक भेटले. ते मूळचे भारतीय; पण आता अमेरिकेत शिकवतात. तेही आमच्या उदास संभाषणात सामील झाले. तिथे म्हणे काही खरं नाही. अवस्था वाईट आहे. वर्गात कुणी कधीही येतो. कधीही जातो. सर शिकवत असताना विद्यार्थी समोर जेवण मांडून जेवायला बसतात. काही जेवणापूर्वी प्रार्थना म्हणतात. मन लावून चवीनं जेवतात. एकमेकांना घास भरवतात. भूक नसलेले विद्यार्थी पाय पसरून बसतात. ऐसपैस बसलेल्या मुलींकडे लक्ष गेलं की सरांचा मुद्दा चुकतो. विसरायला होतं. सर डोळ्यांत पाणी आणून भारतात परत यायचं म्हणत होते. मला इथली परिस्थिती विचारत होते. मी म्हणालो- आमचं बरं आहे. संस्कारांमुळे विद्यार्थी वर्गात जेवत नाहीत. घरी जेवून वर्गात झोपायला येतात. झोप येत नसेल तर एकमेकांना थोपटतात. घोरतात. झोपेत बरळतात. मुद्दा चुकला तर सरांच्या तोंडाला काळं फासतात. उत्साही विद्यार्थी सरांना गाढवावरून फिरवून आणतात. काही पार्टीचे कार्यकर्ते विनामूल्य गाढवं पुरवण्याची व्यवस्था करतात.हे एवढं ऐकल्यावर त्या प्राध्यापकांनी पुन्हा भारताचं नाव काढलं नाही.
मराठी वडापाव
एकदा कारने प्रवास करत असताना एक छोटं शहर लागलं. रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेल्स होती. एका हॉटेलवर वडापावअशी पाटी दिसली. माझं मराठी मन मोहरून गेलं. शेवटी आपण जग काबीज केलं असं वाटून छाती फुगून आली. वडा-पाव खायची इच्छा झाली. सोबतचे गृहस्थ चौकशी करून आले. गृहस्थांचा चेहरा पडला होता. ते हॉटेल पाकिस्तान्याचं (पाकडय़ाचं) होतं. हे ऐकताच मनाचा मोहोर गळून पडला आणि मन पेटून उठलं. आम्ही वडापाव खाल्ला नाही.
अशाच एका शहरात उत्तम भारतीय जेवणाची चौकशी करत करत आम्ही एका हॉटेलात शिरलो. ते पाकिस्तानी माणसाचं हॉटेल होतं. मला आश्चर्य वाटलं. चौकशी केल्यावर कळली ती गोष्ट अशी-
त्या शहरात अनेक भारतीय विद्यार्थी राहतात. जेवायला पाकिस्तानी माणसाच्या हॉटेलात येतात. जेवताना घरच्या जेवणाची आठवण काढून रडतात. पाकिस्तानी त्यांचा मित्र झाला. आपल्या मुलांनी त्याला घरून आणलेले मसाले दिले. अस्सल भारतीय पदार्थ शिकवले. आता मुलांना घरच्यासारखं वाटावं म्हणून तो पाकिस्तानी भारतीय जेवण बनवतो. अस्सल भारतीय जेवणासाठी त्याचं हॉटेल प्रसिद्ध आहे. ही गोष्ट ऐकल्यावर मनाने मोहरून जावं की पेटून उठावं असा गोंधळ उडाला. अमेरिकेत भारतीय मनाला गचके बसावेत अशा गोष्टी सतत घडत असतात.
ही थेट व्हाइट हाऊससमोरची गोष्ट आहे. व्हाइट हाऊससमोरच एक फाटका, रापलेला म्हातारा कर्णा घेऊन खणखणीत आवाजात इंग्रजीतून पर्यटकांशी बोलत होता. त्याच्या देशावर अमेरिकेने केलेल्या अन्यायाबद्दल बोलत होता. छळाच्या, कपटाच्या भयंकर कहाण्या ऐकवत होता. अमेरिकेला शाप देत होता.
तो थकला की रस्त्यावरच एका फाटक्या चटईवर बसायचा. त्याची खंगलेली बायको त्याला पाणी पाजायची. पुन्हा उत्साही पर्यटकांचा तांडा आला की तो उभा राहून शाप देणं सुरू करायचा. आसपास असंख्य पोलीस, रक्षक उभे होते. पण तो आपली सर्व जगासमोर बदनामी करतो म्हणून कुणीही त्याला अडवत नव्हतं, रोखत नव्हतं. म्हाताऱ्याला आक्रोश करायचा अधिकार आहे हे अमेरिकेला मान्य होतं.  इतरांच्या आविष्कार व विचारस्वातंत्र्याचा सन्मान करणाऱ्या अमेरिकेचं कौतुक करायचं की..? मनाचा गोंधळ उडतो. व्हाइट हाऊसपासून थोडय़ाच अंतरावर युद्धात पराक्रम गाजवलेल्या सैनिकांचं स्मारक होतं. माझ्यासोबतचे ते स्मारक बघायला गेले. पण मला काही जावंसं वाटलं नाही. मी पेपर चाळत बाहेर उभा राहिलो. त्यात दुसऱ्या देशावर बॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकन विमानाला आता पायलटची गरज नाही-असलं संशोधन यशस्वी झाल्याची बातमी होती. असो!
अजूनही महासत्तेला आवाज देणारा तो फाटका म्हातारा माझ्या मनातून जात नाहीए.
भारतीय शोषण
भारतीय माणसाला शोषण करायचा किंवा करवून घ्यायचा छंद असतो. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी हा छंद सुटत नाही. अनेक भारतीय मालकांनी अमेरिकेत उत्तम जम बसवला आहे. अनेक उद्योगधंदे सुरू केले आहेत. अमेरिकेत आपले अनेक विद्यार्थी शिकायला जातात. शिकत असताना त्यांना बाहेर नोकरी करता येत नाही. पण खर्च भागत नाही म्हणून ते हॉटेलात, पेट्रोल पंपावर किंवा मॉलमध्ये नोकरी करतात. वीकएन्डला भारतीय हॉटेलात राबणारा वेटर हा डॉक्टर किंवा इंजिनीअर असतो. वेटरला भरपूर टिप मिळते. या विद्यार्थ्यांना मिळालेली टिप भारतीय मालक काढून घेतात. अनेकजण तर पगारही थकवतात. पैसे द्यायची वेळ आली की या मुलांना हाकलून लावतात. पण त्यांना त्याची तक्रारही करता येत नाही. असाच एक शोषित इंजिनीअर भेटला. त्याच्या पंजाबी हॉटेलमालकाने एका काळ्या बाईशी लग्न केलं होतं. आफ्रिकन बाईला शोषण माहीत असल्यामुळे तिला पटकन् आपल्या भारतीय नवऱ्याचे गुण कळले. आता ती स्वत: हॉटेलात येते, स्वत:च्या हाताने मुलांना पगार वाटते. थोडे जास्तच पैसे देते.
एक आंध्रकडची मुलगी भेटली. घरची परिस्थिती बरी नाही. आई-वडलांनी कर्ज काढून तिला शिकायला अमेरिकेला पाठवलं आहे. ती एका भारतीय माणसाच्या दुकानात काम करते. भारतात मालकाचे वडील वारले म्हणून मालक सहकुटुंब भारतात गेले. चार महिने परतले नाहीत. मुलीने दिवसभर दुकान सांभाळलं. रात्री अभ्यास केला. मालक परतल्यावर तिने पैसे मागितले. मालकाने व त्याच्या दयाळू भारतीय बायकोने पैसे तर दिले नाहीतच, वर ते अमेरिकेत बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल व आपल्या दुकानात घुसून चोरी केल्याबद्दल तिला पोलिसात द्यायला निघाले होते. मुलगी घाबरली. त्यांच्या पायावर पडली. तेव्हा कुठे त्यांनी दयाळू होत तिला क्षमा केली. ही मुलगी इथल्या विद्यापीठात संशोधन करते आहे.
आपली अनेक मुलं तिथे बेकायदेशीरपणे राहतात. तिथे त्यांची नोंद नाही. बँकेत खातं नाही. असाच गोव्याचा एक मुलगा भेटला. तो पूर्वी बोटीवर नोकरी करत होता. बोट अमेरिकेच्या आसपास असताना तो निसटला. अमेरिकेत दडून बसला. तिथे तो राबराब राबतो. तो राहतो तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर एक सुंदर गार्डन आहे. गेल्या पाच वर्षांत तिथे जाण्यासाठी तो वेळ काढू शकलेला नाही. मी म्हटलं- असं दडून लपतछपत गुन्हेगारासारखं जगण्यापेक्षा भारतात चल, तिथे सन्मानाने जगता येईल.’ ‘इथे बरं आहे..म्हणून तो बोलायचा थांबला.
तिथे गुन्हेगाराला मिळतो तेवढाही सन्मान भारतात मिळणं शक्य नाही असं त्याला का बरं वाटत असेल? मी अशा अनेकांशी बोललो. ते म्हणतात- आज इथे मजा नसेल, पण उद्या मजा वाटू शकेल.भारतातही उद्या मजा वाटू शकेल अशी खात्री त्यांना वाटावी म्हणून आपण काय करायला हवं? असो!
अमेरिकेत आलेले अनेक पर्यटक पटापटा फोटो काढत होते. फोटोसाठी पुढे पुढे धावत होते. कुणीच कुठे थांबायला तयार नव्हते. संध्याकाळी सगळे पटापटा फोटो फेसबुकवर टाकत होते. आता फोटो बघून सगळे जळतील म्हणून आनंदित होत होते. सगळं इतरांना जळवण्यासाठी.. स्वत:साठी काही नाही.
तुम्ही फक्त स्वत:साठी म्हणून कुठेतरी सहलीला जायला हवं. निवांत. बाहेरचं बघता बघता आत डोकावायला हवं. त्यासाठी शुभेच्छा! 

No comments:

Post a Comment